आमच्या गावामध्ये आलेली सुंदर टुरिंग टॉकीज..

माझ्या लहानपणी1958,59 चा काळ असावा.  आमच्या मालगुंड गावामध्ये करमणुकीचे प्रकार म्हणजे गावकरी मंडळीनी केलेली नाटके ,जी वर्षातून साधारणपणे एकदा प्रत्येक वाड्यामध्ये होत असत. प्रत्येक  वाडीची वेगवेगळी  असायची. तसेच आजूबाजूच्या गावांच्या नाटके पाहण्यासाठी पण आम्ही ग्रुपने रात्री जायचो. प्रामुख्याने नाटके रात्री जेवण झाल्यानंतर साधारण नऊ दहा वाजता सुरू होत ती अगदी रात्री दोन-तीन वाजेपर्यंत चालत. तसेच एकदा जवळजवळ महिना दीड महिना एप्रिल मे मध्ये गावामध्ये आमच्या शेतामध्ये 'सुंदर टुरिंग टॉकीज' नावाचं तंबू मध्ये असलेलं सिनेमा गृह आले होते. त्यावेळी ट्रक सदृश्य एक चार चाकी वाहन, आणि ट्रक मधून मला मोठा तंबू काही ,आराम खुर्च्या, काही बाकडे आणि मोठमोठ्या सतरंज्या असे साहित्य आले होते. एक-दोन दिवसात आमच्या शेतातील जागा त्यांनी साफ करून एक भला मोठा तंबू उभारला. साधारण सात आठ माणसे हे काम करत होते. त्यातलेच काही माणसे शेतातच एका कोपऱ्यात जेवण बनवायचे. तिसऱ्या दिवशी सिनेमा थिएटर सुरू  झाले. गावात थेटर आल्यापासूनच त्यांनी दर दिवशी कोणता सिनेमा आहे हे एका बैलगाडी वरून दोन्ही बाजूला जाहिरातीचे फलक लावलेली बैलगाडी फिरवली. तसेच सायकलच्या दोन्ही बाजूला बोर्ड लावलेली सायकल पण  रोज दिवसातून एक वेळा गावातून मुख्य रस्ते व इतर छोट्या वाड्यातून पण फिरायची. बरोबर ताशा वाजत असे. रात्री एकच शो असायचा. तंबूच्या आत मध्ये पुढील बैठकी वरती सतरंज्या अंथरलेल्या असत, त्यानंतर बाकडी आणि दोन्ही साईडला काही आराम खुर्च्या असत. तंबूच्या मागील बाजू ती चार चाकी गाडी उभी असायची आणि त्याच्यामध्ये भलं मोठं सिनेमा दाखवायचं यंत्र असायचं. दुपारच्या वेळी जो सिनेमा असेल त्याची बारीक बारीक रीळे एकमेकांना जोडून एका मोठ्या रीळा मध्ये हाताने फिरवून घेत असत आणि ती मशीनला सिनेमा दाखवण्यासाठी लावत. तेव्हा जोडताना जे काही छोटे छोटे तुकडे फिल्म तुटलेले असायचे ते आम्हाला ऑपरेटर काका द्यायचे. आम्ही भावंडे व मित्र बहिरगोल भिंग आणि टॉर्च याच्या साह्याने भिंतीवर त्या स्लाइड बघायचो.आमच्या जागेत तो तंबू असल्यामुळे आमच्या घरच्या मंडळींना फुकट सिनेमा बघायला पास होते. तशी रोज बऱ्यापैकी गर्दी असायची. मला आठवत असलेल्या सिनेमा पैकी काही सिनेमांची नावे... रामराज्य, सिंहगड, देव बाप्पा, दूध भात, राम राज्य,आंधळा मागतो एक डोळा वगैरे.. ऐतिहासिक आणि काही सामाजिक सिनेमा बघायला मिळायचे. अर्थात आम्हाला ऐतिहासिक आणि विनोदी सिनेमा बघायला घरची मंडळी द्यायची. काही वेळेला सिनेमांमध्ये पाहता पाहता झोप पण लागायची. पण घराच्या मागेच थेटर असल्यामुळे कोणीतरी उचलून घरी आणत असत. ट्रक मध्ये असलेला छोटा जनरेटर लाईट देण्याचं काम करत असे. महिन्या,दीड महिना नंतर पावसाळ्याच्या आधी सुंदर टुरिंग टॉकीज आपला गाशा गुंडाळून परत दुसऱ्या गावी निघून गेली. माझ्या आठवणीतील अशी एकदाच ती येऊन गेली. अशा गावातील लहानपणीच्या आठवणी आम्ही विसरू शकत नाही. मजे चे आनंदाचे दिवस होते..... राम केळकर. बावधन पुणे.

Popular posts from this blog

१७५ वर्षाची पूर्ण प्राथमिक शाळा आताची आदर्श जीवन शिक्षण शाळा. नंबर १ मालगुंड.

माझ्या साद सागराची या पुस्तकावर आलेले अभिप्राय..1

मोबाईल पेंटिंग एक छंद...