मोबाईल पेंटिंग एक छंद...


तशी मला लहानपणापासूनच ड्रॉइंग आणि पेंटिंगची आवड होती. साधारण तिसरी,चौथीचा असताना शाळेमध्ये दसऱ्याला पाटी वरती आम्ही सरस्वतीचे चित्र काढून त्याची पूजा करायचो .बहुतेक सर्वजण एक एक आकडा काढून त्याचं रांगोळी सारखं चित्र काढायचे. मी मात्र सरस्वती देवीचा फोटो काढायचा प्रयत्न करायचो आणि ते बऱ्यापैकी चांगलं व्हायचं. हळूहळू पुढे माझे काही मित्र पण माझ्याकडून त्यांच्या पाटी वर चित्र काढून घेत. लहानपणी रफ पेपरवर मी खूप रेखाचित्र काढायचो .त्यावेळी आमच्या बाजूला एक गोखले मास्तर म्हणून राहत होते. ते मला कधी कधी थोड गाईड करत. आठवीमध्ये गेल्यानंतर मला इंग्लिश शाळेमध्ये चित्रकला विषय होता ते बहुदा कोसुंबकर किंवा मेहंदळे गुरुजी शिकवायचे. त्यांना माझी चित्रे  खूप आवडायची. त्यांनी  मला ड्रॉइंग च्या पहिल्या परीक्षेला बसवले . आणि पुढील वर्षी लगेच दुसऱ्या परीक्षेला बसवले . मी परीक्षा पण पास झालो. महाराष्ट्र शासनाची परीक्षा असायची. शाळेमध्ये असताना देखील क्लास चालू असताना  वहीच्या मागील पानांवर मी असंच रेखाटन करायचो. असा कधीच दिवस गेला नाही की मी काहीतरी दोन-चार चित्रे रेखाटली नाहीत. त्याचवेळी मी मित्राने मारलेल्या रेघोट्यां वर  आणखी रेषा काढीत त्यातून  चित्र निर्माण करीत असे. कित्येक वेळा वहीवर पडलेल्या शाळेच्या ठिपक्या मध्ये मी एक टक लावून बघायचो आणि मला त्याच्यात काहीतरी तरी चित्र आहे असं वाटायचं.मी ते काढायचा प्रयत्न करायचो .असं करत करत मला त्याची सवय झाली. आणि चांगली चित्र काढायच्या नवीन नवीन कल्पना येऊ लागल्या. मला निसर्ग चित्र जास्त आवडतात. खूप डिटेल्स मध्ये जाऊन चित्र करायचा मी कंटाळा करतो.त्यामुळे मी पटापट करता येणार असतील असे चित्र काढू लागलो. मला पेंटिंग डायरेक्ट रंग घेऊनच करायला आवडतं आणि तसेच मी करतो . आधी रेखाटन करून नंतर रंगवायला विशेष आवडत नाही .त्यामुळे मोबाईल वरील पेंटिंग मला खूप सोपं पडतं. कागद नको घ्यायला, रंग नको घ्यायला, पाणी घ्यायला नको, ब्रश घ्यायला नको मनात आलं की डोळ्यासमोर चित्र उभं करायचं आणि लगेच ते हातातून मोबाईल वरती काढायचं .जास्तीत जास्त वीस पंचवीस मिनिटात एक पेंटिंग करण्यात जो आनंद होतो तो मला खूप समाधान देऊन जातो. काही वेळेला त्याच्या मध्ये  त्रुटी  राहून जातात. आता या 75 वर्षात AI वापरायची इच्छा आहे प्रयत्न चालू आहेत.मोबाईल पेंटिंग चा आनंद उपभोगतो.  चित्र काढल्यावर ते लगेच ते फेसबुक वरती किंवा व्हाट्सअप वरती मित्रांना आणि ओळखीच्या लोकांना पाठवतो .त्यांच्या कॉमेंट्स वाचायला आवडतं. काही पेंटिंग्ज चे मी खूप वर्षापूर्वी प्रदर्शन पण केलं होतं. त्यावेळी मंगेश तेंडुलकर यांना मी मोबाईल वरती काढलेली चित्रे खूप आवडली. त्यांना सुद्धा त्यावेळी हे असं करतात माहिती नव्हतं. त्यांनी मला त्या वेळेला सांगितलं मोठी टॅबलेट घेऊन तुम्ही आणखीन अशी चित्रे काढत रहा. मी काढलेल्या मोबाईल पेंटिंग वरती माझे मित्र श्री अरुण काकतकर, सौ. संगीता सप्रे, सौ. कविता नातू यांनी काही काव्य केलेली आहेत. श्री.काकतकरांनी केलेल्या काही कविता वर मी पेंटिंग केली आहेत. आणि त्यांच्या चित्राक्षरी या पुस्तकामध्ये माझ्या पेंटिंग वरती केलेल्या कविता समाविष्ट केल्या आहेत. माझे काही पेंटिंग मी ए 3 साईझ मध्ये प्रिंट करून घेतली.  त्याच्या फ्रेम्स करून काही माझ्या मित्रांना आणि काही नातेवाईकांना भेट दिल्या. त्यांनी पण आनंदाने  त्यांच्या घरामध्ये त्या पेंटिंग ला स्थान दिलं. आत्ता सुद्धा कधी शांतपणे डोळे मिटून बसलो असलो की डोळ्यासमोर काही नवीन चित्र दिसू लागली तर लगेच मोबाईल घेऊन पुढल्या पंधरा-वीस मिनिटात जे काही तयार होईल पेंटिंग करतो ,ते तसेच ठेवून देतो. परत बघताना त्यात काही सुधारणा कराव्याशा वाटल्या  तर दुसऱ्या वेळी काही करतो, नाहीतर तसेच फेसबुक वरती बघण्यासाठी पोस्ट करतो . साधारणपणे अगदी मन लावून पेंटिंग करायचं म्हटलं तर 25 ते 30 मिनिट लागतात. त्याच्यापेक्षा जास्त बसू शकत बसू शकत नाही एका वेळेला ! आत्तापर्यंत हजारो अशी चित्र  मी मोबाईल वरती काढली. खूप वर्षापूर्वी काही पेंटिंग मी कॉम्प्युटर वरती पण केलेली आहेत. मर्चंट शिप वरती इंजिनियर असताना मी स्केचेस आणि पेंटिंग करत होतो पण मोबाईल वर पेंटिंग करायला मला खूप आवडतं कारण मनात आलेलं दृश्य लगेच मोबाईलवर काढता येतं. कॉम्प्युटर वरती देखील मी काही स्चेचप थ्रीडी मॉडेल तयार केली आहेत. एक नामांकित युट्युबर श्रीमती मधु सागर यांनी माझी मोबाईल पेंटिंग वरती एक क्लिप तयार केली आहे....  राम केळकर बावधन.पुणे








Popular posts from this blog

१७५ वर्षाची पूर्ण प्राथमिक शाळा आताची आदर्श जीवन शिक्षण शाळा. नंबर १ मालगुंड.

माझ्या साद सागराची या पुस्तकावर आलेले अभिप्राय..1