मालगुंड मधील आमच्या लहानपणीचे कमळाचे तळे
मालगुंडचं कमळाचं तळं बालपणीच्या आठवणी .....
लहानपणीच्या सर्वात गोड आठवणींपैकी एक म्हणजे नदीपार असलेलं ते प्रचंड मोठं कमळाचं तळं...
आमच्या घरापासून नदी ओलांडून डाव्या बाजूला, तळेपाट आणि बौद्ध वाडीच्या दरम्यान ते तळं होतं. एकराहूनही मोठी जागा असावी. घरातून नदीकडे जाताना दोन्ही बाजूला लहलहणारी भातशेती दिसायची. एका बाजूला खालच्या निवेंडीकडे जाणारा रस्ता होता - आता त्या भागाला "भगवती नगर" म्हणतात. आणि दुसऱ्या बाजूला बौद्ध वाडी.
पूजेसाठीची कमळं...
मला समज यायच्या आधीपासूनच आमची मोठी भावंडं, काका आणि गावातील इतर मंडळी तिथून कमळं आणायची. गणपतीच्या दिवसांत, विशेषतः मार्गशीर्ष महिन्यात लाल, पांढरी आणि नाजूक "कौमुदी" फुलं आणण्याची पद्धत होती. इतर वेळीही देवपूजेसाठी किंवा देवांच्या तसबिरींना हार घालण्यासाठी हीच लाल-पांढरी कमळं वापरली जायची.
कमळाचा हार करणं हा आमच्यासाठी एक खेळच होता. कमळाच्या लांब देठाला डाव्या-उजव्या बाजूने थोडे-थोडे मोडून आपल्याला हवे तेवढा सुंदर हार तयार करायचा. ती मजा काही औरच होती.
तळ्यातील मजा आणि भीती...
ते तळं बरंच खोल होतं. काठाकाठाला असलेली पांढरी कमळं आणि कौमुदी लहान मुलं सहज तोडायची. पण लाल, मोठी कमळं मात्र मधल्या खोल पाण्यात असायची. तळ्यात जळवा ही भरपूर होत्या. काहींना त्या चावायच्या, पण मला मात्र कधी चावल्या नाहीत.
आम्ही मोठे झाल्यावर एकदा घरच्या पूजेसाठी सर्व भावंडांनी मिळून 1000 पांढरी कमळं आणि 50-100 लाल कमळं आणली होती. त्यावेळी आमच्याबरोबर आमच्या बायका आणि मुलंही होती. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, आम्ही तेव्हा तरुण होतो.
कमळं काढताना आतल्या चिखलात आणि कमळकांद्यात पाय अडकायचा, पण कधी भीती वाटली नाही. तेवढा धिंगाणा आणि मजा होती.
नदी ओलांडण्याचा आनंद...
तळ्याकडे जाताना नदी ओलांडणं म्हणजे एक सणच होता. त्या वेळी नदीवर पक्का पूल नव्हता. एकतर बांबूचा साकव असायचा किंवा पाणी कमी असेल तर आम्ही थेट पाण्यातूनच नदी पार करायचो. नदीच्या मधोमध थोडा वेळ उभं राहिलं की छोटे-छोटे मासे पायाला बारीक-बारीक चावायचे. तो स्पर्श आजही आठवतो.
आजची स्थिती आणि मनातील शांती...
आता बरीच वर्षे झाली. लोक सांगतात की त्या तळ्याच्या जागी आता विहिरी खोदल्या आहेत. त्या भागात गेलं की जागा ओसाड वाटते.
पण आजही 78 व्या वर्षी लाल-पांढरी कमळं आणि शांत पाण्यात तरंगणारी कौमुदी पाहिली की मनाला एकदम शांती मिळते. गावच्या त्या निसर्ग सौंदर्याची आणि जुन्या दिवसांची खूप आठवण येते.
अशा असंख्य सुखद आठवणी आहेत. त्या लिहून काढताना आणि कोणाशी शेअर करताना मनाला खूप समाधान मिळतं.
बघू, जमेल तसं अजून लिहीन.
राम केळकर, मरीन इंजिनियर
बावधन, पुणे