मला आठवत असलेल्या गावातील लहानपणीच्या आठवणी 1955 पासून...1
मला आठवत असलेला १९५५ /५६ सालापासून पुढे गावात असलेल्या काही गोष्टी... आमच्या गावातील रस्ते हे डांबराचे किंवा काँक्रीटचे नसत लाल माती तेच असत. बैलगाडी जाण्यासाठी त्याचा वापर केला जायचा. क्वचित गावात एखाद दुसरा चार चाकी वाहन यायचं. कारण आमच्या गावा मध्ये येण्यासाठी गणपतीपुळ्याची खाडी ओलांडून यावे लागे. तेथे भरती असेल तर बैलगाडी पण जाऊ शकत नसायची. त्याला मोरी म्हणायचे याच्यावरून ओहटी असताना रहदारी होत असे. जास्त करून प्रवासी म्हणजे गणपतीपुळ्याला एसटीने येणारे छोट्या होडीतून याला आम्ही तरी ..(छोटी होडी )म्हणायचं .त्याच्यातून ते गावात यायचे किंवा शहरात जाण्यासाठी एसटी पकडायला गणपतीपुळे जायचे. आमच्या कुटुंब कडून तरी पार करणाऱ्या होडी वाल्याच्यापरिवाराला वर्षा साठी काही धान्य दिले जायचे त्यामुळे तो आम्हाला आणि आमच्या नातेवाईकांना मोफत प्रवास करू द्यायचा. गावाच्या खाडीच्या साईडला पूर्वी मिठागर होत .त्याच्या काही भिंतीचा भाग आम्ही मुलं आणि गावातील काही सीनियर सिटीजन संध्याकाळी येऊन गप्पा मारायला बसण्यासाठी करत. मला आठवतंय त्याप्रमाणे श्री. अंबुकर , डॉक्टर रानडे .संध्याकाळच्या वेळी खाडीवर कोल्हे येत असत. त्यांची कोल्हेकुई आम्हाला खूप रात्रीपर्यंत ऐकू यायची. खाडीच्या आसपासच्या भागाला खाजण म्हणत. तेथे मेलेली गुरे आणून टाकत. गिधाडे भरपूर प्रमाणात येऊन मेलेल्या गुरांचा मास खात असत. पंचक्रोशीतील आठवी ते अकरावी असलेली अशी आमची बळीराम परकर विद्यालय ही एकच शाळा असल्यामुळे गणपतीपुळे, वरवडे, निवेंडी, आरे वारे मधील विद्यार्थी दोन्ही बाजूच्या तरी पार करून शाळेत येत असत. निवेंडीहून येणाऱ्या मुलांना पावसाळ्यात नदीवर असलेला साकव म्हणजे बांबू पासून केलेला ब्रिज ओलांडून यायला लागायचे. यामुळे अतिवृष्टी झाली की खाडीला नदीला भरपूर पाणी घ्यायचे आणि तर बंद असायची, नदीवरील साकव पाण्याखाली असल्यामुळे येऊ शकत नसत त्यामुळे आम्हाला शाळेकडून अतिवृष्टीची सुट्टी असायची. पावसाळ्यात सात आठ वेळा तरी सुट्टी मिळायची. जेथून गावाची सुरुवात व्हायची गणपतीपुळे कडून तेथे मिठागराच्या पांढऱ्या बांधाशी जवळच एक छोटं तळं होतं त्यात गाई म्हशी डुंबत. थोडं पुढे आल्यावर डाव्या हाताला पोस्ट ऑफिस ची इमारत होती. आणि समोरच्या बाजूलाच देवी डॉक्टरांचा दवाखाना आणि घर होतं. थोडं पुढे आल्यावर ती डाव्या हाताला माझी लहानपणीची शाळा पूर्ण प्राथमिक मराठी शाळा मालगुंड अशी नाव असलेली होती नंतर तिचे नाव जीवन शिक्षण शाळा असे झाले. सी आकाराची शाळा समोर गार्डन आणि लहान मुलाला खेळायला घसरगुंडी वगैरे वगैरे साधने होती. शाळेनंतर लगेचच एक भंडारवाड्यात जाण्यासाठी पायवाट होती आणि त्याच्या बाजूला भटक्या गाई गुरांसाठी कोडवाडा होता. गावामध्ये रोज गावाच्या सुरुवातीपासून बळीराम परकर विद्यालयापर्यंत संध्याकाळी रोज ठराविक अंतरावर असलेल्या केरोसीन लॅम्प मध्ये दिवा लावला जायचा. ग्रामपंचायती चा शिपाई हातात शिडी आणि रॉकेल चा डब्बा आणि काच साफ करायला फडकं घेऊन दिवा लावी. अर्थात दिवा म्हणजे गावातला मुख्य रस्ता आहे हे समजण्यासाठी असावा बहुतेक! गावाच्या दुसऱ्या टोकाला तीवरी बंदर होतं. तेथून मुंबई आणि गोव्याला जाणाऱ्या बोटी यायच्या. तेथे एक लाईट हाऊस, तिकीट काढण्यासाठी ऑफिस, कस्टम हाऊस आणि त्यांच्यासाठी संडास त्याच्या जवळूनच बोटीवर जाण्यासाठी तराफे म्हणजे मोठ्या आकाराच्या बोटी इथून सुटत तेथे जाण्यासाठी दगडाच्या पायऱ्या केलेल्या होत्या. मुंबईहून येणारी शिप साधारण साडेआठ नऊ पर्यंत यायची आणि जाणारी बोट मात्र रात्री उशिरा येत असे. बोटीने वाज वले ला भोंगा गावभर ऐकू यायचा. आणि टाकलेला सर्च लाईट डोंगरा वरती दिसायचा. दोन-तीन बैलगाड्या बोटीवर लोकांना सोडण्यासाठी आणि आणण्यासाठी गावातून जात असत. आबा जोशी,वसंत बापट आमची पण कधीतरी आमच्या कोणी पाहुणे असेल तर आणण्यासाठी जायची. तिवरी बंदरा वरून गावातील लोक आंब्याच्या पेट्या, फणस, झाडू वगैरे घेऊन मुंबईला जात. आमच्या लहानपणी रत्नागिरी, अँथनी, रोहिदास, चंपावती अशा स्टीम वर चालणाऱ्या बोटी मुंबई गोवां या मार्गावर होत्या. पावसाळ्यात त्या बंद असत. गावामध्ये दोन नद्या होत्या. त्यातला एका नदीला फक्त पावसाळ्यात पाणी असायचं. पहिल्या नदी जवळच एक मोठं कमळाचे तळ होत त्यामध्ये लाल रंगाची, पांढऱ्या रंगाची आणि नाजूक कोमुदी अशी फुले लागत. आम्ही त्यातून खूप पांढरी आणि लाल फुलं आणायचो. शाळेत येणारी काही मुलं त्यातून फुल आणून त्याच्या देठाची माळ करून शाळेतील गणपती लक्ष्मी आणि सरस्वती या देवाना घालत..... लीहीण्या सारखे आणखीन भरपूर आहे आता इथेच थांबतो पुढील भाग काही दिवसांनी.... राम केळकर पुणे.