कोकणातील विहिरीवर बसवलेले रहाट गाडगे...
माझ्या लहानपणीच्या आठवणीतील कोकणातील आणखीन... आता कुठे सहसा न दिसणारी गोष्ट म्हणजे विहिरीवर बसवलेले रहाट गाडगे. कोकणातील जास्त करून विहिरी गोल आकाराच्या असायच्या. विहिरी वरती हात रहाट, पाय रहाट, आणि पाय रहाटाला वाढवून त्याला पुढे दोन गोल लाकडा मध्ये तयार केलेले गेअर लावून तो रहाट रेडा किंवा बैल याला लावून चालवला जायचा. हे सर्व लाकडाचे असायचे. आणि हे सर्व तयार करणारे गावातीलच सुतार असायचे. हात रहाटा ला दोरी बांधून त्याला घागर किंवा बादली लावून विहिरीतून पाणी काढले जात असे. पाय रहाट हात आणि पाय याचा उपयोग करून फळी वर बसून चालवायचा. मी तो चालवला आहे . तिसरा प्रकार जास्ती करून वाडी मधील नारळ, पोफळी, केळी व इतर फळ झाडे यांच्यासाठी एक जनावर साधारण सकाळी दीड दोन तास आणि संध्याकाळी एक तासभर रहाटा वरून पाणी काढत असे. जनावराला त्याचे डोळे बांधून ठेवलेले असल्यामुळे ते जनावर गोल गोल फिरत असे आणि त्यामुळे रहाटाचे ते पाणी काढणे चालू असायच. चित्रांमध्ये त्याचं चित्र आहे ते आपण पाहावं. गावांमधील काही लोकांकडे असे रहाट गाडगे असायचे . ज्यांच्याकडे गुरे असायची आणि मोठी बाग असायची त्यांना त्याचा चांगला उपयोग व्हायचा. जास्ती करून रेडेच या कामासाठी वापरायचे .कारण त्यांचा बाकी त्याचा काही उपयोग नसायचा. बैल हे बैलगाडी आणि शेतीसाठी, नांगराला वापरले जायचे. रहाटा ला पाणी काढण्यासाठी जी माळ नारळाच्या काथ्या पासून बनवली जायची ती बहुतेक लोकांच्या घरी शेजारी,पाजारी आणि काही हौशी लोक एकत्र येऊन ज्याच्याकडे ती बनायची असेल तिथे रात्रीच्या वेळी येऊन अगदी काथ्याचे दोर बनवून त्याचा दोर तयार करून नंतर त्याला लोटे बांधण्यासाठी लाकडाच्या खीट्या लावे पर्यंत सर्व काम रात्री बारा एक पर्यंत पुरी करत. खिट्या म्हणजे एक ते दीड इंच जाडीचे आणि साधारण 12, 14 इंच असे लाकडाचे तुकडे. त्याला मध्ये मध्ये खाचे असतात.नंतर ती माळा पाण्यामध्ये भिजवून ठेवत. दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी ती तयार झालेली माळ रहाट गाडग्या वरती बसवली जायची आणि त्यामध्ये मातीचे मडके काही ठराविक अंतरावर लावली जायची. हे सर्व काही मजुरी न घेता सर्वजण एकमेकांसाठी प्रेमाने करत. त्या रात्री काहीतरी पोहे, कॉफी, सरबत वगैरे अधून मधून घेत असत. खूप मजा यायची सर्व बघायला. आम्ही लहान असल्यामुळे आम्हाला फक्त बघायचे काम असायचे. खूप मजा वाटायची. मला वाटतं गावामध्ये अजूनही एक मेकांचं काम करणारी लोक आहेत. ही माणसं कधीच परकी वाटली नाहीत. सर्वांकडे नारळाची झाड आणि त्यापासून तयार केलेला काथ्या असायचा. आमच्याकडे काथ्या पासून दोर बनवायचं यंत्र पण होतं. यंत्र साधच असायचं ते हाताने फिरवायला लागायचं. ते काम मात्र मी केलेल आहे. वयाच्या साधारण १०,११ वर्षापासून मी स्वतः हात रहाटाने , पाय रहाटाने आणि रहाटा ला रेडा बांधून पाणी काढलेले आहे. रेड्याच्या डोळ्याला झापण साधारणपणे सुपारीच्या झाडाचं त्याच्या झावळी पासून तयार केलेलं असायचं. मातीच्या मडक्या मधील पाणी जांभ्या दगडाच्या चिऱ्या पासून केलेल्या लांबट खोळी मध्ये पडायचं इथून पुढे चिऱ्या मध्ये केलेल्या पन्हाळी मधूनच पुढे चिऱ्या मध्ये खोदलेल्या दोणी मध्ये पडत असे. आणि दोन भरल्यानंतर पाणी पुढे पाटाने नारळ, पोपळ, इतर फुल आणि फळ झाडे यांना दिले जात असे. काही ठिकाणी पाणी वळवायला लागायचे त्यासाठी फावड्या चा उपयोग करायला लागायचा. अर्थात थोडं कमी जास्त पाणी मिळालं तरी जास्ती काही फरक पडायचा नाही. विहिरी जवळच भांडी घासणे, कपडे धुणे , आंघोळी करणे, गुरांना पाणी पाजणे हे सर्व होत असे. केळ्याच्या बाजूलाच सुरण , अळूपण लावलेला असायचा. सुरण आणि केळी तर एवढी व्हायची ती वेगळी लावायला लागायची नाही. लहानपणी आमच्याकडे सुट्टीमध्ये आलेल्या पाहुण्यांना पण पाणी काढायला खूप मजा वाटायची. काहीजण घाबरत पण. बहुतेक सर्व विहिरी वरती कोणी पडू नये म्हणून बांबूपासून तयार केलेले झाकण असायचे. त्यामुळे कोणी पडला तर बांबू मुळे विहिरीत जाऊ शकत नव्हता. नंतर काही वर्षांनी फक्त हात रहाट राहिले आणि आता तर सर्व कडे पंप लागले आहेत. काही लोकांनी लाकडाचे रहाट काढून लोखंडी रहाट लावून घेतले.... असे हे आठवण तील कोकणातील रहाट गाडगे..... राम केळकर, बावधन.8975234214