हृदयविकाराच्या आधी आणि नंतर शरीराची अवस्था कशी असते..

हृदयविकाराच्या आधी आणि नंतर शरीराची अवस्था ..शिप वरती केलेल्या पंधरा वर्षा मधील कामे आणि वादळी संकटे ,टेन्शन च्या परिणामा मुळे कीवा नंतर दोन वर्ष शिप रिपेरिंग वर्क शॉप मध्ये आलेले टेन्शन आणि शरीराचे झालेले हाल, म्हणजे कोणत्याही वेळी,दिवस आणि रात्री अवेळी किती वेळ दग दग आणि कमी झालेली झोप यामुळे पण माझा वयाच्या 38 वर्षी डावा हात दुखायला सुरुवात झाली. पहिले दोन-तीन महिने विशेष लक्ष दिले गेले नाही.नंतर डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांना स्पॉंडि लायसिस वाटले. त्यावर त्यांनी मानेला बांधायचा पट्टा दिला. तो दोन-तीन महिने वापरला, हात दुखत होताच.नंतर एक दोन महिन्या नंतर डोळे ओढल्या सारखे वाटायला लागले. डोळ्याला नंबर आहे म्हणून चष्मा दिला पण पॉइंट 0.25 होता.तरीही हात दुखत च होता. थोडा थोडा दम लागत होता. नोकरी चालूच होती शिप रिपेरिंग काम चालू होतं. शिव वरती वर खाली ड्रायडॉक मध्ये अशी खूप दगदग व्हायची.एक दिवस ड्रायडॉक मध्ये शिप असताना  खूपच दम लागू लागला. चार पावलं चाललं पण कठीण होतं होत, सोबतच्या एका कामगाराला घेऊन घड्याळ गोदी ते मशिद बंदर कसा बसा थांबत थांबत गेलो. आणि तासा भरात रेल्वेने ठाणा स्टेशनला उतरलो. स्कूटर स्टॅन्ड ला ठेवली होती. तिथे स्कूटर चालू होईना .वीस पंचवीस किक मारल्या स्कूटर चालू होत नव्हती. छाती पूर्णपणे भरून आली होती. स्कूटर च्या प्लगची वायर निघाल्याचे लक्षात आले. कसेबसे ती लावून घरी आलो. छातीत दम भरला होताच . लगेच डॉक्टरांकडे गेलो त्यांनी कार्डिओ लॉजीस्ट कडे  लगेच पाठवले. सो कॉल्ड प्रसिद्ध डॉक्टर! त्या डॉक्टरने लगेच ईसीजी काढला.(मुद्दाम त्या डॉक्टरचा एकेरी उल्लेख केला आहे कारण त्यांनी मला आणि पत्नीला धीर देण्या ऐवजी घाबरवून सोडले.) माझ्या तोंडावरच मला सांगितले तुम्हाला हार्ट अटॅक येण्याची शक्यता आहे!कठीण आहे !!थोडा वेळ थांबून मी पत्नीसह घरी आलो. दुसऱ्या दिवशी आमच्या फॅमिली डॉक्टर ना सर्व सांगितल्यावर त्यांनी लगेच ग्रँड रोडला डॉक्टर सोनेजी यांच्याकडे पाठवले. डॉक्टर सोनेजिनी रिपोर्ट पाहून सांगितले हा तर हार्ट अटॅक येऊन गेल्याचा ECG आहे ! आणि त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी हिंदूजा हॉस्पिटलमध्ये आयसोटोप नावाची म्हणजेच शरीरात डाय इंजेक्ट करून हृदयाचं काम कसं चालतं कुठे कुठे रक्त पुरवठा होत नाही ते पाहूया असे सांगितलं. त्यावेळी आयसोटोप ही नवीनच होती. सहसा कोणी करायचं नाही कारण आयसोटोप शरीरात टोचून घ्यावे लागत. आणि त्याचवेळी शरीराच्या हालचाली चालू ठेवायच्या असतात. थोडक्यात ट्रेडमिल सारखच. न्यूक्लिअर मेडिसिन! पण आम्ही खूप विचार करून होकार दिला. त्यामध्ये रक्तवाहिनी मध्ये दोष असल्याचे आढळून आले. हृदयाच्या या सर्व टेस्ट करेपर्यंत भरपूर वेळ गेल्यामुळे माझ्या हृदयाचा काही भाग डॅमेज झाला होता. म्हणजे येथील स्नायु डेड झाले होते.त्यानंतर गिरगाव मध्ये एका प्रसिद्ध हॉस्पिटल हरकिशदास मध्ये ट्रेडमिल टेस्ट केली. नंतर नायर हॉस्पिटलमध्ये एनजीओ ग्राफी केली. त्यात राईट रक्तवाहिनी पूर्णपणे ब्लॉक होती असे आढळून आले आणि लेफ्ट रक्तवाहिनी 75 टक्के ब्लॉक आहे असे कळले.डॉक्टर सोनेजी यांनी जवळजवळ एक-दीड वर्ष मला  औषध दिली. आणि  अधून मधून चेक करून घेत होतो. पण काम करता येणे शक्य होते. त्यामुळे डॉक्टरने औषधा वरच ठेवले. त्यावेळी खूप कमी बायपास भारतात होत असत. परदेशी जाऊन करू शकत नव्हतो. परवडणारे ही नव्हते.  तरुणपणात असा खूप कठीण प्रसंग आला होता. मोठा मुलगा आठ वर्षाचा आणि लहान  मुलगा तीन वर्षाचा होता.माझ्या पत्नीने खूप धैर्याने उभे राहून मला मोला की साथ दिली, ती स्वतः मेडिकल फील्ड मधील असल्याने हृदयास संबंधित सर्व पुस्तके आणि जी काही मिळेल ती सर्व माहिती जमवली. आणि मला पण वाचायला दिली. या विषयावर PhD मिळेल एवढा आमचा अभ्यास झाला होता. त्यामुळे खूप धीर आला होता. तीन महिने मी घरी होतो पगारा शिवाय!त्यावेळी एक छोटे टपरीवजा  दुकान काढून तिथे मी बसत होतो. हळूहळू कॉन्फिडन्स येत होता. दुकानातून उत्पन्न काहीच मिळत नव्हते खर्च जास्त .पण मला कॉन्फिडन्स आला की मी काम करू शकतो! चुकीचे सल्ला देणारी पण खूप भेटायचे घाबरवयाचा प्रयत्न पण करायचे काहीजण.पण मी आणि माझी पत्नी अशा लोकांकडे दुर्लक्ष करत होतो.  डॉक्टरच्या वरती ठेवलेला विश्वासा मुळे आणि सेल्फ कॉन्फिडन्स मुळे तोंड देत होतो.आणि मी माझे काम बऱ्यापैकी करत होतो. दम अधून मधून लागायचा पण खूप  दगदग झाल्यावर, कारण हृदयाचा काही भाग डॅमेज झालेला भरून आलेला नव्हता.  कधी कधी पाठीत फार दुखायचं. नंतर दम लागणे आणि पाठीत दुखणे रेग्युलर व्हायला  लागल्यानंतर  मग 1990 साले नायर हॉस्पिटलमध्ये अँजिओग्राफी केली. तेव्हा लेफ्ट ची 85%. ब्लॉक होती आणि राईट साडीची 100%. त्यानंतर पंधरा दिवसांनी त्यावेळी म्हणजे 1990 ला बलून थेरेपी साठी इन्स्ट्रुमेंट मागवलं त्यावेळी 18 हजार रुपये त्याची किंमत होती. नायर हॉस्पिटल येथे बलून घालून  85% ब्लॉक होती ती रक्तवाहिनी थोडी मोठी केली. उजव्या साईडची पुरी ब्लॉक असल्यामुळे ती उघडता आली नाही. उजव्या साईटची बंद असली तरी त्यामुळे जास्त काही फरक पडत नव्हता. ही बलून ची शस्त्रक्रिया करताना करताना मी स्वतः बघत होतो. डाय इंजेक्ट केल्यानंतर ती डाय हृदयातील रक्तवाहिन्या मधून कशी चालली होती ते त्यात दिसत होती. प्रथम त्यांनी रक्तवाहिन्यां मध्ये बलून  घालून जिथे ब्लॉकेज होते ते हळूहळू बलून फुगवून ती रक्तवाहिनी मोठी केली. त्यावेळी छातीवर मोठ्या हत्तीने पाय ठेवला असे वाटत होते. डॉक्टर सांगत होते जोपर्यंत सहन करता येत तोपर्यंत सांगत रहा. ती रक्त वाहिनी ओपन केल्यानंतर त्यांनी उजव्या बाजूची रक्तवाहिनी ओपन करायचा प्रयत्न केला. पण ती उघडता आली नाही. त्यामुळे उजव्या बाजूचे ब्लॉकेज तसेच राहिले होते.आणि त्यासाठी दोन दिवस नायर हॉस्पिटलमध्ये राहायला लागले. तिसऱ्या दिवशी घरी सोडले. तेव्हापासून रोज सकाळी लवकर उठून, अर्धा लिटर गरम पाणी त्याच्याबरोबर दोन लसूण पाकळ्या खाऊन नंतर सकाळी अर्धा तास चालायला जाऊन नंतर ऑफिसला जायचो .हळूहळू सुधारणा वाटू लागली. नवीन छोट्या छोट्या रक्तवाहिन्या तयार होत होत्या.त्यामुळे हृदयाची शक्ती बऱ्यापैकी वाढत होती. डॉक्टरांच्या म्हणण्या प्रमाणे तरुण पणामुळे असेल.  हृदय थोडंसं डॅमेज झालं होतं पण काम करता येत होत. काय वेळेला गॅसेस झाले किंवा इतर काही झालं तरी ते दुखणं हृदयाच आहे असं वाटायचं. 1990 पासून पुढील आठ वर्ष मी व्यवस्थित कामावर जात होतो. शिप रिपेरिंग काम व्यवस्थित पार पडत होते. परत 1998 यावर्षी मी बोटीवर दोन महिन्यासाठी चीफ इंजिनियर म्हणून गेलो होतो त्यावेळी दोन महिने तेथे राहिल्यानंतर घरी आलो.त्यानंतर दहा वर्षांनी मला परत त्रास सुरू झाला.आणि एक दिवस गाडीची बॅटरी डाउन झाल्यामुळे ती बदली करायला जवळच एका बॅटरी वाल्या कडे जाऊन बदली करून घेतली आणि येताना मला गाडी चालवायला त्रास वाटू लागला छाती भरूनआली,डोळ्यांसमोर अंधेरी येत होती, कशीबशी गाडी मी आमच्या ठाण्यातील प्रसिद्ध कार्डिओ लॉजीस्ट डॉक्टर कुंबळा यांच्यापर्यंत घेऊन आलो. त्यांनी ECG काढला आणि काही न बोलताच ॲडमिट करून घेतले. एक दिवस तिथे ठेवून नंतर सर्व समजावून सांगून धीर देऊन घरी सोडले. आणि पंधरा दिवसानंतर हिंदू ज्यामध्ये अँजिओग्राफी साठी पाठवले. हिंदुजा मध्ये डॉक्टर कौशल पांडे यांनी अँजिओग्राफी केली त्यामध्ये डावी 95% आणि उजवी पूर्ण ब्लॉक आढळून आली. वय पन्नास असल्यामुळे लगेचच बायपास करावी असा सल्ला दिला. त्यावेळी काही महा भागानी यांची बायपास झाली होती त्यांनी मला घाबरवयचा प्रयत्न केला. अस सांगितले की तुम्ही मृत्युपत्र तयार करून ठेवा वगैरे... पण आम्ही अशा लोकांकडे लक्ष दिले नाही.अर्थात अश्या वेळी खूप महत्त्वाचं ते म्हणजे घाबरून काही होत नाही.पैशाची जमवा जमा करून पंधरा दिवसानंतर डॉक्टर पांडे यांनी माझी बायपास 4 एप्रिल 1998 हिंदुजा हॉस्पिटलमध्ये मध्ये बायपास केली. ऑपरेशन व्यवस्थित पार पडल.दुपारी अडीच वाजता ऑपरेशन झालं. मला सहा वाजता ऑपरेशन थेटर मधून बाहेर काढलं. त्या वेळेला काही सेकंद जाग आली. तेव्हा मला कळलं सहा वाजलेत. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता मी पूर्ण शुद्धीत आलो. तेव्हा मी आ यसीयू मध्ये आलेलो होतो,16, 17 निळ निराळ्या प्रकारच्या ट्यूब शरीरावर लावलेल्या होत्या. तोंडात लावलेला पाईप औंढा गिळायला पण त्रास द्यायचा. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काही ट्यूब वायर काढल्या. तिसऱ्या दिवशी फक्त दोन म्हणजे ड्रेन साठी ,मॉनिटर, आणि सलाईन इंजेक्शन साठी ज्या काही ट्यूब होत्या त्या ठेवून बाकी सर्व काढल्या. दुसऱ्या दिवशी आयसीयू मध्ये असताना खूप ओळखीचे आणि नातेवाईक यांनी मला भेटण्यासाठी बघण्यासाठी येऊन गेले . मी पूर्णपणे शुद्धीत असल्याने त्यांना हात दाखवून ठीक असल्याचा कळवले. तिसऱ्या दिवशी मला ट्वीन शेअरिंग रूम मध्ये शिफ्ट केले. आणि मला बेड च्या बाजूला रोज सकाळ संध्याकाळ तीन-चार फेऱ्या मारायला सांगितले आणि मी ते केले. तिसऱ्या दिवशी रात्रीच खूप थंड वाटत असल्यामुळे कारण एअर कंडिशनिंग चा झोत माझ्यावर डायरेक्ट बेडवर येत असल्यामुळे मी पत्नीला सांगून बेडवर स्टूल ठेवून त्यावर उभा राहिलो आणि तो फ्लो अड्जस्ट केला. कारण सांगूनही कोणी करत नव्हते. नंतर मला डॉक्टर ओरडले ती गोष्ट वेगळी. तेथे टेंपरेचर मुद्दामच कमी ठेवतात कारण त्यामुळे जंतूंची वाढ होत नाही. कारण पेशंटला इन्फेक्शन पासून जपावं लागतं. चौथ्या दिवशी एक जिना चढ उतरायला सांगितलं. पाचव्या दिवशी सर्व चेक अप करून सहाव्या दिवशी दुपारी मला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज दिला. माझ्या डाव्या हाताची रक्तवाहिनी मॅच होत नसल्यामुळे डाव्या पायाची  काढून लावली आणि दुसरी हृदयामध्ये असलेल्या देवाने दिलेल्या जादा रक्तवाहिनता  उपयोग केला.) त्या दिवशी सकाळी ऑपरेशन झाले त्या ठिकाणी छातीवर जी चिकटपट्टी लावली होती ती झटपट ओढून काढली. त्यामुळे काही सेकंद पट्टी  निघताना थोडसं दुखलं. डायबिटीस नसल्यामुळे जखमा लगेचच भरून आल्या. त्यावेळी बाय पासला खर्च दीड पावणे दोन लाख झाला होता. अडीच तीन महिने आराम करून तीन महिन्यानंतर जेएनपीटी ला अडीच तास गाडी चालवत रोज कामावर जाऊ लागलो. आणि गाडी चालवत परत येत होतो. औषधे आणि चालणे हे मात्र नेहमी नीट चालू ठेवले. काही दिवसानंतर मी ब्रह्म विद्या शिकून घेतली. तसेच डॉक्टर बाई नामजोशी यांनी दाखवलेले काही योग प्रकार नित्यनेमाने चालू ठेवले. (अजून सुद्धा करतो.) जानेवारी 2009 पर्यंत सर्व व्यवस्थित चालू होतं. एक दिवस पंधरा-वीस किलोची झाडाची कुंडी गॅलरी तून उचलताना त्रास झाला. आणि मी सात-आठ सेकंद जमिनीवर धाडकन पडलो . माझी शुद्ध थोडा वेळ हरपली होती. शुद्ध आल्यानंतर लगेच खिशा मध्ये असलेली सोर्बिटेड गोळी जिभे खाली ठेवल्यावर ठीक वाटायला लागल. लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो परंतु तेथील डॉक्टराना निदान नीट करता आले नाही. त्यांनी मेंदूवर उपचार करणाऱ्या गोळ्या दिल्या. तेव्हा ECG वगैरे नॉर्मल वाटला असावा. मेंदूवर असणाऱ्या औषधामुळे चार पावलं पण नीट चालता येत नव्हते. एक महिना हॉस्पिटलमध्ये होतो. सर्व टेस्ट केल्या .त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना काही पत्ता लागला नाही. महिन्यानंतर घरी आल्यावर आमचे नेहमीचे डॉक्टर कुंबला अमेरिकेतून परत आल्यावर लगेच त्यांची भेट घेऊन त्याला काय झाले होते ते सांगितले. त्यांनी मेंदूवर असलेल्या गोळ्या हळूहळू बंद करत आणून एन्जिओ ग्राफि करण्यासाठी आणि वेळ आल्यास स्टेट टाकण्यासाठी तयारी ठेवायला सांगितले. महिन्यानंतर ठाण्यातील हॉस्पिटल जुपिटर येथे एन्जिओ ग्राफी केली. त्यामध्ये मला एक जास्त असलेल्या आणखीन एका नवीन रक्तवाहिनी मध्ये 95% ब्लॉकेज सापडले. त्यांनी लगेचच आम्ही होकार सांगितल्यामुळे तेथे एक स्टेट टाकला. बायपास केली त्यावेळेला तेथे त्यावेळी असलेल्या टेक्निशियने मला ओळखले आणि त्यांनी सांगितले तुमच्या बायपास वेळेला मी तिकडे होतो. आत्ता सुद्धा बायपास चे दोन्ही ग्राफ व्यवस्थित आहेत, एकदम क्लिअर! चार दिवसांनी घरी आलो आणि दोन-तीन दिवस घरी राहून लगेच कामावर जाऊ लागलो. त्यानंतर वयाच्या 63 व्या वर्षी नोकरी सोडून पुण्याला मुलाकडे आम्ही दोघं राहू लागलो. दर एक दोन वर्षानंतर ब्लड टेस्ट करून घेतो, दोन-तीन वर्षानंतर ईसीजी, इकॉकॉर्डियो ग्राम काढून घेतो. अजून तरी सर्व व्यवस्थित आहे असे डॉक्टरने सांगितले. रोज कमीत कमी अडीच ते तीन किलोमीटर काही वेळेला चार किलोमीटर पण चालतो. आणि एक तास योगासन त्याच्यामध्ये हाता पायाचे व्यायाम करतो. रोज सकाळी तोंड धुवायच्या आधी दोन लसूण पाकळ्या, एक छोटा चमचा जिरे आणि ओवा, दोन भिजवलेले बदाम, दीड अक्रोड, चाऊन खातो आणि वरती अर्धा लिटर अर्धा लिंबू, थोडी हळद, थोडी सुंठ पूड असे कोमट पाणी रोज पितो. आज माझं वय 75 पुढे आहे. थोडी सुगर आहे पण कंट्रोलमध्ये .बायपास नंतर कोणत्याही टेस्ट साठी कधी घाबरलो नाही. बायपास करून घेतल्यामुळे डोक्यावरती असलेली टांगती तलवार असलेली भीती निघून गेली. चांगला डॉक्टर मिळाला की सर्व व्यवस्थित होते. त्यांनी सांगितलेली पथ्य आणि औषधे व्यायाम वेळेवर करणे महत्त्वाचे असते. आता भारतामध्ये बायपास व्यवस्थित होते. ऑपरेशन नंतर महिनाभर तरी कोणी पेशंटला न भेटलेले चांगले कारण त्याची प्रतिकार शक्ती कमी झालेली असते आणि काही लोक काहीतरी शंका काढून उगाच घाबरवण्या चा प्रयत्न करतात. शेवटी सर्व नशिबाचा भाग असतो हेच खरे !... राम केळकर कर बावधन पुणे.

Popular posts from this blog

१७५ वर्षाची पूर्ण प्राथमिक शाळा आताची आदर्श जीवन शिक्षण शाळा. नंबर १ मालगुंड.

माझ्या साद सागराची या पुस्तकावर आलेले अभिप्राय..1

मोबाईल पेंटिंग एक छंद...