मैत्री नात्या पुढील ....

आम्ही 2002 मध्ये घोडबंदर रोडवर शुभारंभ सोसायटीतील आमच्या नवीन फ्लॅटमध्ये राहायला आलो.माझे वय साधारण  53 वर्षाचे होते. ही सोसायटी साधारण अडीचशे फ्लॅट धारकांची होती. बागेमध्ये फिरताना ओळखी होऊ लागल्या. सोसायटीत खूप फ्लॅटधारक वयाने तरुण आणि नुकतेच लग्न झालेले होते. बहुतेक फ्लॅट धारक हे माझ्या मुलांच्या पेक्षा साधारण सात आठ वर्षांनी मोठे होते. संध्याकाळी बागेत  असताना खूप तरुण मुलांची मुलींची त्यांच्या लहानग्या मुलांसोबत ओळखी झाल्या. आमच्या कुटुंबातील सर्वांनाच बोलायची आवड आणि लहान मुलांची आवड असल्याने आमची तेथील खूप कुटुंबाची चांगली दोस्ती जमली. पहिले काही महिने सोसायटीतील बागेमध्ये गप्पा व्हायच्या, मग हळूहळू शनिवारी किंवा रविवारी आम्ही घोडबंदर रोडच्या जवळपास असलेल्या निसर्ग सानिध्यात दुपारी जेवायला जायाचो. मैत्री वाढत गेली  तस तसे  रोज  संध्याकाळी  लहान मुले आमच्या घरी  थोड्या वेळासाठी जमत असत. त्या मुलांना न्यायला त्यांच्या आया पण येत असत. लहान मुलांसाठी आम्ही खाऊ तर आणून ठेवायचो, आणि खाऊ ठेवलेला जागा पण मुलांना बरोबर माहिती असायची. नंतर हळू हळू शनिवारी रात्री सर्वांची जेवणे आटोपल्यावर आमच्याकडे कॅरम खेळण्यासाठी दोन-तीन फॅमिली त्यांच्या मुलांबरोबरच यायची. मुले आपापसात खेळायची किंवा आमच्या बेडरूम मध्ये जाऊन टीव्ही वरती कार्टून फिल्म बघत असत. आमचा कॅरम खेळण्याचा कार्यक्रम रात्री खूप उशिरापर्यंत चालायचा पार्टनर वेगवेगळे बदलायचे, चहापाणी, आईस्क्रीम असं काहीतरी खेळताना व्हायचं. रात्रीचे दोन अडीच सुद्धा कधी वाचायचे कळायचे नाहीत! महिन्या दोन महिन्यातून एकदा रविवारी खास बिर्याणीचा कार्यक्रम असायचा.  आम्ही एका प्रसिद्ध बिर्याणी शॉप मध्ये ऑर्डर देऊन आणायचो.आम्ही पंधरा वीस जण त्या दिवशी खूप मजा करायचो . कोणाही घरचा कार्यक्रम आपल्या घरचाच कार्यक्रम आहे अशा दृष्टीने सर्वजण त्यात भाग घेत. कोणालाही आजारपण आल तर अगदी घरच्या माणसासारखी एकमेकांची काळजी घेतली जायची.ठाण्याहून निघून आम्हाला आता बारा वर्षे झालं पण तेथे काढलेली दहा वर्ष आम्ही कधी विसरणार नाही. अजूनही आम्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असून कोणाच्याही घरच्या कार्यक्रमाला न विसरता एकत्र जमतो. व्हाट्सअप वरून जुन्या आठवणी, आठवणीचे फोटो एकमेकांना शेअर करतो. रक्ताच्या नात्या पेक्षा जोडलेले नातं खरोखरच अनमोल असतं हा आमचा अनुभव आहे..... राम केळकर पुणे.

Popular posts from this blog

१७५ वर्षाची पूर्ण प्राथमिक शाळा आताची आदर्श जीवन शिक्षण शाळा. नंबर १ मालगुंड.

माझ्या साद सागराची या पुस्तकावर आलेले अभिप्राय..1

मोबाईल पेंटिंग एक छंद...