मी आणि संगीत...

तसा माझा आणि संगीताचा संबंध अगदी लहानपणा पासून. गावामध्ये झोपाळ्यावर रोज संध्याकाळी शुभम करोति, रामरक्षा, हनुमान स्तोत्र आणि त्यानंतर काही श्लोक झाल्यावर आमच्या आत्या आम्ही सर्व भावंड आणि  शेजारची आलेली काही मुले असे सर्व जुनी गाणी रोज म्हणत मोठे झालो. त्यावेळी आशा भोसले ,लता मंगेशकर, माणिक वर्मा, सुमन कल्याणपुर यांची भावगीते जास्ती करून आमच्यापेक्षा मोठी असलेल्या ताई आणि आत्या या म्हणत असत. नंतर आम्ही आमच्या शाळेतील कविता मोठ्याने म्हणायचो. हे रोजचे कार्यक्रम. रामनवमीला वगैरे गावातील देवळामध्ये भजन कीर्तन चालायचे. तसे काही संगीत नाटके गावात कधीतरी येणारे नाटक कंपनी सादर करायचे ,ते पाहायला आणि ऐकायला मात्र आम्ही जात असोत. नाटकातील एखादे संगीत कलाकार पुण्या मुंबईवरून येत असत. संगीत सौभद्र, मंदार माला,स्वयंवर अशी आणि इतर नाटके ते करत. भार्गवराम आचरेकर हे एक चांगले आठवतात! बाकी शाळेतील शारदोत्सवा मध्ये आम्ही लहान मुलांनी केलेली, नाचलेली गाणी आणि काही मुलींचीच नृत्य आणि गाणी होत असत. गावातील हौशी तबला आणि पेटी वादक अशा कार्यक्रमाला साथ देत. विठ्ठल मंदिरात होणाऱ्या नाटकामध्ये श्रीयुत परशुराम केळकर यांची खूप गाणी आम्ही लहानपणी ऐकली आहेत. आणखीन काही गावातील खेळे, गावकऱ्यांची कोकणातील गाणी आणि रोज रेडिओवर सकाळी मंगल प्रभात, नंतर रात्री नऊ वाजता होणारा सिलोन रेडिओवरील "बिनाका गीतमाला"हा कार्यक्रम इथपर्यंतच आमचं संगीत होतं. एकदा रत्नागिरीला दहा-बारा वर्षाचा असताना माझ्या मावशी बरोबर मी ज्येष्ठ संगीतकार श्री.सुधीर फडके यांच्या "गीत रामायण" कार्यक्रमाला गेलो होतो.  तंबोरा लावेपर्यंत मी जागा होतो नंतर मला झोपच कधी  लागली हे समजलं नाही. एका चांगल्या कार्यक्रमाला त्यावेळी मुकलो. मरीन इंजिनिअरिंग करण्यासाठी मी खारला माझ्या साठे काकांकडे राहत होतो. तेथे मात्र काकांकडे मोठमोठे गायक कलाकार येत असत. पंडित जितेंद्र अभिषेकी,पंडित राम मराठे, पंडित गिंडे, पंडित भट,पंडित अभ्यंकर बुवा, पंडित प्रसाद सावकार वगैरे वगैरे . त्यांचे कार्यक्रमअगदी   जवळून पाहिले.माझ्या एका आत्याचे यजमान दादा आपटे यांना शास्त्रीय संगीताची खूप आवड होती. त्यांच्याकडे मोठं मोठे गायक कलाकार खूप वेळा येत असत.पंडित व्यास देखील नेहमी येत असत. माझ्या काकूला पण गायनाची आवड होती. तिला शिकवण्यासाठी  पंडित अभ्यंकर बुवा आठवड्यातून दोन-तीन वेळा येत असत. खारला साडे चौदाव्या रस्त्यावर आमच्या आत्याच्या घराजवळच संगीतकार हेमंत कुमार राहत. खार जिमखाना जवळ एस डी बर्मन, जवळच किशोर कुमारचा देखील बंगला होता.तेथे  सुप्रसिद्ध संगीतकार सी.रामचंद्र हे देखील येत. शेजारीच प्रसिद्ध संगीतकार चित्रगुप्त राहत होते त्यामुळे जवळपास सर्व संगीत विश्व होते. मला स्वतःला मात्र गाता येत नव्हते! माझी  एक मावस बहिणीकडे प्रसिद्ध सतार वादक पंडित उस्मान खान तिला शिकवायला येत असत. ती छान सतार वाजवायची. आते बहिण संगीत शिकत असताना कधी कधी तीला तंबोऱ्या वर किंवा पेटी वर तिने सांगितलेला स्वर् मी धरत असे बस एवढाच संगीताशी संबंध! हिंदी मराठी गाणी मात्र ऐकायला खूप आवडायची म्हणजे संगीत नाट्यगीते देखील.नंतर शिप गेल्यावर तेथे पार्टीमध्ये काही ऑफिसर गिटार,बासरी,कीबोर्ड वाद्य वाजवायचे ते ऐकायला छान वाटायचे. शिप वरती केबिन मध्ये असताना कॅसेट पलेअर वर सर्व प्रकारची गाणी मी माझ्या ऑफ टाईम मध्ये नेहमी ऐकायचो, एक चांगला विरंगुळा होता. गाणे ऐकताना कधी कधी छान झोप पण लागून जायची. नंतर मात्र शोअर जॉब घेतल्यावर मधली कित्येक वर्ष संगीत ऐकायला पण वेळ मिळाला नाही. नंतर काही वर्षांनी सुदैवाने माझी मुंबई हून बदली ठाण्या जवळच रबाळे येथे झाल्याने मला संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घरी यायला मिळायचे .त्यावेळी मी प्रसिद्ध मराठी गायक सौ सुवर्णा माटेगावकर, रानडे पिताआणि चिरंजीव,प्राजक्ता जोशी, विभावरी आपटे यांचा स्वर तरंग रंग हा कार्यक्रम न चुकता टिव्हीं वरती पहायचो. कान तृप्त होत असत.रात्री जेव्हा लहान मुलांचा सा रे ग म प कार्यक्रम सुरू झाला तो देखील मी कधी चुकला नाही. अगदी कधी चुकला तर परत जेव्हा तो प्रसारित व्हायचा तो न चुकता पहायचो. त्यातील लहान कलाकार खूप छान गाणी गायचे. आर्या, शमिका, मुग्धा,शाल्मली यांच्या आई वडिलांचे देखील माझी चांगली ओळख होऊन गेली. पुढे  त्यांचे कार्यक्रम भरपूर कार्यक्रम मी पाहिला जायचोच. शमिका तर आमच्या रत्नागिरी ची तीच्याकडे नेहमी  जाणे व्हायचे. अजून यातील काही मंडळी संपर्कात आहेत. एकंदर सर्व पाहता जेवढे कार्यक्रम पुण्यामध्ये गायनाचे होतात तेवढे मुंबईला कधी झालेले आठवण नाहीत. या सारेगमप मधील लिटिल चॅम्प चा सहभाग असलेला एका सीडी च्या वितरण समारंभाला मुंबईला मी गेलो होतो. त्याचं नाव " आठवा स्वर"खूपच छान झाला. अजून त्याची सीडी मी अधून मधून ऐकतो. आमच्या घरात आमच्या सुनबाई, माझी पत्नी, माझा आणि नातू हे पण संगीता वर खूप प्रेम करतात .नातू कीबोर्ड  शिकत आहे, सून बाईंना देखील संगीताची आवड असून चार परीक्षा झालेल्या आहेत.संगीतावर लिहिण्या सारखे भरपूर आहे पण किती लिहिणार आठवते तेवढे लिहिले. आज वयाच्या 75 व्या वर्षी देखील जुन्या संगीताच्या आठवणी मला आठवायला आवडतात. संगीताने मात्र मनाला जो आनंद मिळतो तो कोणत्याही इतर आनंदापेक्षा वेगळा असतो हे मात्र निश्चित !!... राम केळकर बावधन पुणे

Popular posts from this blog

१७५ वर्षाची पूर्ण प्राथमिक शाळा आताची आदर्श जीवन शिक्षण शाळा. नंबर १ मालगुंड.

माझ्या साद सागराची या पुस्तकावर आलेले अभिप्राय..1

मोबाईल पेंटिंग एक छंद...