साबण एक पूर्ण पिढीचा प्रवास. प्रवास आहे ....
साबण एक पूर्ण पिढीचा प्रवास. प्रवास आहे ....
लाईफ बॉयच्या लाल साबणा पासून ते आजच्या लिक्विड सोप पर्यंत... आणि मधला तो "हातून सटकणारा साबण" वाला संघर्ष...
साबण आणि आपलं आयुष्य - लाल लाईफ बॉय पासून लिक्विड सोप पर्यंत!
1. लहानपणीचा लाल दैत्य - लाईफ बॉय, हमाम
लहानपणी साबण म्हणजे फक्त लाईफ बॉय आणि हमाम.
लाईफ बॉय तर हात धरता येणार नाही एवढा मोठा आणि लाल. रेडिओवर "लाईफ बॉय है जहाँ, तंदुरुस्ती है वहाँ" हे गाणं दिवसातून दहा वेळा लागायचं. त्यामुळे तो साबण म्हणजे आरोग्याचं प्रतीक वाटायचा. अंग घासून घासून लाल व्हायचं, पण साबण संपता संपत नसे.
2. मोठे झाल्या वरचा खजिना - बोटीवरील इम्पोर्टेड साबण...
नोकरीला लागलो, बोटीवर गेलो... आणि तिथे महिन्याला 4-4 इम्पोर्टेड साबण मिळायचे. आम्हाला तेवढे लागतच नव्हते. त्यामुळे साबण जमा होत गेले. सुट्टीला घरी येताना बॅग भरून साबण आणायचो.पत्नी म्हणायची "आता वर्षभर साबण विकत घ्यायची गरज नाही". तो काळ वेगळाच होता.
3. वय वाढलं आणि सुरू झाली खरी कसरत
60-65 नंतर आंघोळ म्हणजे एक युद्धच.
साबण हाताला लावला की तो सटकतो. हातावर साबण, पायावर साबण, डोळ्यात साबण पाणी... आणि मधेच तो साबण फरशीवर हमखास सटकायचा.. त्याला उचलायला गेलो तर पडण्याची भीती.
कधी कधी स्टुला वरती बसलो असताना साबण नेमका अशा कोपऱ्यात जातो की उठल्या शिवाय मिळतच नाही. आणि उठलो की हातातून पुन्हा सटकतो. आता पायाला साबण असल्यामुळे पाय घसरून पडायची पण भीती. खूप जण पडतात देखील.साबण पकडणे ही एक मोठी कलाच झाली आहे आता आंघोळ करताना.
4. साबणाचे प्रकार आणि नवीन जमाना
आता बाजारात साबणाचे शेकडो प्रकार. पण परदेशात तर साबणच जवळपास संपला.
बाथरूममध्ये लिक्विड सोप, बॉडी वॉश, शॅम्पू... सगळं पंप करून. पाणी मारलं की फेस, आणि संपलं. हातातून सटकण्याचा प्रश्नच नाही. साबणाची ती वडी आणि तिची मजा हळूहळू इतिहास जमा होत आहे.
5. कोरोना काळात साबणाचा दुसरा अवतार
कोरोना आला आणि साबण देव झाला.
बाहेरून आलो की पहिलं काम हात-पाय-तोंड साबणाने धुणे. जिना चढलो तरी हात धुणे. लोकांना अशी सवय लागली की खिशात छोटा साबण किंवा सॅनिटायझर नसेल तर चैनच पडत नसे. साबणाने आपल्याला फक्त स्वच्छच नाही केलं, तर वाचवलंही.
तर काय साबण हा फक्त स्वच्छतेचं साधन नाही तर
तो आपल्या लहानपणीचा लाल लाईफबॉय आहे, बोटीवरचा इम्पोर्टेड खजिना आहे, म्हातार पणातली कसरत आहे... आणि आजच्या काळातली सवय आहे.
साबण माणसाच्या जीवनातून कधीच जाणार नाही. फक्त त्याचा आकार आणि रूप बदलत राहील.... डोक्यात आले लिहून काढलं, आवडलं का? अभिप्राय नक्की द्या !! राम केळकर मरीन इंजिनियर बावधन पुणे.