एकदा काय झालं....
साधारण वीस-पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट. माझी बायपास सर्जरी होऊन दोन-तीन वर्षेच झाली होती. वय तेव्हा ५५ च्या आसपास. डॉक्टरांनी जपून राहायला सांगितलेलं, पण नशिबाला कदाचित माझी परीक्षाच घ्यायची होती.
माझे सासू-सासरे ठाण्यात, चरईत आमच्या घरापासून अगदी पाच-सहा मिनिटांच्या अंतरावर राहत होते. वय दोघांचेही ७५ च्या जवळपास. घरी दोघेच. एके रात्री दहाच्या सुमारास त्यांनी घराचा मेन दरवाजाचा लॅच लावला आणि काही कारणाने पुन्हा उघडायला गेले, तर दरवाजा काही केल्या उघडेना. आतूनही नाही आणि बाहेरूनही नाही. कुलूप जाम झालं होतं.
घरात दोन वृद्ध माणसं अडकली. त्यांनी जवळ असलेला स्क्रू ड्रायव्हर, पक्कड घेऊन खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ. शेवटी काळजीने त्यांनी मला फोन केला, " अहोराम, आम्ही घरात अडकलो आहोत. दरवाजा काही उघडत नाहीये. काहीतरी करून उघडून द्या बाबा."
फोन ठेवला आणि मी आणि माझी पत्नी लगेच स्कूटरवरून त्यांच्या सोसायटीत पोहोचलो. त्यांचा फ्लॅट दुसऱ्या मजल्यावर. मुख्य दरवाजा बाहेरूनही उघडत नव्हता. मग एकच मार्ग उरला - शेजारच्या बाल्कनीतून त्यांच्या बाल्कनीत जाणे.
जमिनीपासून साधारण २५-३० फूट उंची. खाली बघितलं तर डोळ्यांसमोर अंधारी येईल अशी उंची. पण वेळ विचार करायची नव्हती, कृती करायची होती.
मी शेजाऱ्यांना विनंती केली. कमरेला एक मजबूत दोरी बांधली आणि दोरीचं दुसरं टोक शेजारच्या दोघा-तिघांच्या हातात घट्ट धरायला दिलं. हातात हातोडा, स्क्रू ड्रायव्हर घेतला आणि त्या दोरीच्या आधारावर मी त्या बाल्कनीच्या कठड्यावरून कसाबसा सरकत त्यांच्या बाल्कनीत प्रवेश केला.
वर चढताना एकच मंत्र मनात होता - *खाली बघायचं नाही.* हा मंत्र मला बोटीवरच्या पंधरा वर्षांच्या नोकरीने दिला होता. जहाजावर वादळात, उंचावर काम करताना शिकलेलं हेच धैर्य त्या रात्री कामी आलं.
बाल्कनीतून घरात शिरलो. मग त्या जाम झालेल्या कुलुपाशी बसलो. हातोडा, स्क्रू ड्रायव्हरच्या साह्याने खूप लटपट, खटपट केली. घामाने अंग चिंब झालं होतं. बाहेर माझी पत्नी, आणि बाल्कनीत सासू-सासरे आणि शेजारी काळजीने बघत होते. ५५ वर्षांचं वय आणि बायपास झालेला माणूस हे धाडस करतोय म्हणून सगळेच घाबरले होते.
पण शेवटी, त्या खटपटीला यश आलं. एक जोराचा आवाज झाला आणि कुलूप खटकन उघडलं! दरवाजा उघडला. सासू-सासऱ्यांच्या जीवात जीव आला.
त्या रात्री मला जाणवलं, बायपासने शरीराला जरी मर्यादा घातली असेल, तरी जहाजावर पंधरा वर्षे काढताना समुद्राने जे धैर्य शिकवलं होतं, संकटाला हसतमुखाने तोंड कसं द्यायचं हे जे शिकवलं होतं, ते रक्तातच भिनलं होतं. आणि त्याच धैर्याच्या जोरावर त्या रात्री मी माझ्या कुटुंबाला त्या बंदिवासातून सोडवू शकलो.
आजही तो प्रसंग आठवला की अंगावर काटा येतो आणि मनात एक समाधानही.